मुंबईचा महापौर हिंदू असेल, मुंबईचा महापौर मराठी असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याच वाक्याचा आधार घेऊन संयुक्त मुलाखतीत उद्धव ठाकरे यानी मराठी आणि हिंदू म्हणजे काय? हा प्रश्न विचारला होता. उद्धव ठाकरेंनी जी टीका केली, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरेंची टीका नेमकी काय?
मुंबईचा महापौर मराठी होईल असं आम्ही सातत्याने सांगतोय, भाजपाचं म्हणणं आहे की मुंबईचा महापौर हिंदू होईल. मग मराठी माणूस हिंदू नाही का? देवेंद्र फडणवीस हिंदू नाहीत का? मराठी माणसांना गोळ्या घाला सांगणारा मोरारजी देसाई हिंदू होता की नव्हता? मोरारजी देसाई गुजरातमधे जन्मलेले हिंदू होते की नव्हते? मराठी माणूस हिंदू आहे की नाही हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं, याचं कारण असं की मोदींना जेव्हा अटलबिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकत होते, तेव्हा त्यांना वाचवणारे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा अस्सल मराठी माणूस होता.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना काय उत्तर दिलं?
उद्धव ठाकरे कधी कधी इतकं बाळबोध बोलतात, की त्याला काय उत्तर द्यावं समजत नाही. मुख्यमंत्री राहिलेला माणूस इतकं बाळबोध बोलतो. मूळात आपण जर पाहिलं तर दोन गुजराती वगैरे जे काही म्हणत आहेत त्यावर एक त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माला गुजरातमध्ये आले, खासदार उत्तर प्रदेशचे आहेत आणि देश चालवत आहेत दिल्लीहून, ही त्यांची क्षमता आहे. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत नरेंद्र मोदी कुठेही गेले तर किमान ५० हजार लोक जमतात, याला लीडरशिप म्हणतात, ती घरी बसून तयार होत नाही. जनतेत जाऊन लीडरशिप तयार करावी लागते. मोदींची असूया उद्धव ठाकरेंना का वाटते? इतक्या गोष्टी आपल्या मनात ठेवून असं बोलायचं याला काही अर्थ नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मराठी महापौर हा विषय का आला? कारण…
मराठी आणि हिंदू महापौर विषय का आला हे सांगतो, कृपाशंकर सिंह हे मीरा भाईंदरमध्ये गेले, तिथे त्यांना विचारणा आला की उत्तर भारतीय इथे जास्त प्रमाणात राहतात, आमचा महापौर कधी होईल? त्यावर ते असं म्हणाले की तुम्ही इतके नगरसेवक निवडून द्या की जे उत्तर भारतीय असतील त्या दिवशी महापौर बनेल, ते स्टेटमेंट मुंबईत आणलं आणि असे तुटून पडले की उत्तर भारतीय पाकिस्तानातूनच आले आहेत. ज्यावेळी जलील म्हणाले की बुरखेवाली महापौर होईल. संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा बोलता येईना. यांचे चेहरे उघडे पडले की उत्तर भारतीय मीरा भाईंदरला म्हटल्यावर चेकाळून आमच्या अंगावर आले होते. त्यामुळे मला हे सांगावं लागलं मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल, मराठीच होईल आणि हिंदूच होईल असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे.








Leave a Reply