“बहिणीला वाटले मी मरण पावले”, चर्चमध्ये नेमकं काय घडलं होतं? जेमिमा रॉड्रिग्सने सांगितला तो भयानक प्रसंग
भारतीय महिला संघातील फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने २०२५ हे वर्ष गाजवलं. महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत भारताने जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. हे जेतेपद मिळवून देण्यात तिने मोलाची भूमिका बजावली. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली शतकी खेळी निर्णायक ठरली. महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेसाठी तिची दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी तिने बालपणातील एक धक्कादायक आठवण सांगितली आहे.वर्ल्डकपविजेती जेमिमा रॉड्रिग्ज जेव्हा अवघ्या ८ वर्षांची होती, त्यावेळी तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली होती. ती आपल्या चुलत भावांसोबत चर्चमध्ये गेली होती. त्यावेळी एक कार्यक्रमादरम्यान लहान मुलं चर्चच्या बाहेर खेळत होते. तर वरिष्ठ मंडळी चर्चच्या आत होते. सर्व मुलांनी मिळून एक खेळ खेळायला सुरुवात केली.ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या कार्यक्रमात बोलताना जेमिमा रॉड्रिग्ज म्हणाली, “आम्ही एका सभागृहात होतो, जिथे चर्चचा कार्यक्रम सुरु होता. सर्व मुलं बाहेर होते. आम्ही एकमेकांना चप्पल मारायचा खेळ खेळत होतो. माझ्या चुलत बहिणीने मला चप्पल मारून फेकली आणि ती घेण्यासाठी मला पलीकडे उडी मारायची होती. मी हिरोगिरी करायच्या नादात चप्पल आणायला गेले आणि पहिल्या मजल्यावरून खाली पडले.”जेमिमा ज्यावेळी पहिल्या मजल्यावरून खाली पडली त्यावेळी सर्व घाबरले होते. हा किस्सा सांगताना जेमिमा म्हणाली, “सुदैवाने खाली एक महिला बसली होती. मी तिच्या डोक्यावर जाऊन पडले. पण मी खाली पडण्याचा प्रकार इतका भयानक होता की, माझ्या चुलत बहिणीला वाटलं मी मेले आहे.” सुदैवाने या घटनेत जेमिमाला कुठलीही दुखापत झाली नाही.
आगामी हंगामात दिल्लीचं नेतृत्व करणार
जेमिमा रॉड्रिग्जला महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेसाठी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. वर्ल्डकप विजयात मोलाचं योगदान दिल्याचं फळ म्हणून तिला दिल्लीचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये ऑस्टेलियाविरुद्ध खेळताना तिने १२७ धावांची निर्णायक खेळी केली होती.








Leave a Reply